Saturday 23 April 2016

SVB

"मी म्हणजे ना शरीर | मी मद ग्रंथांचा संभार ||"

मराठवाडयातील एक संत व थोर कीर्तनकार म्हणून  संतकवी श्री दासगणू महाराज अध्यात्माच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. शिर्डीच्या श्री साईबाबांच्या आज्ञेने त्यांनी संतचरित्रे लिहिली. त्यांनी दीड लाख काव्य-वाड्मय लिहून मराठी भाषेला समृद्ध केलेच पण त्यांच्या लेखनात समन्वविशेष दिसून येतो. भक्तिमार्गाचा प्रचार, संन्नीती -सदाचाराची शिकवण देऊन समाज जागृती करणे  हे  त्यांचे  जीवनसूत्र  होते. त्यांचे कार्य मराठी सारस्वताला एक देणगीच आहे. ते पंढरपुरी कार्तिक व. १३ शके  १९११ (२६  नोव्हेंबर १९६२) या दिवशी वैकुंठवासी झाले.त्यांचे उत्तराधिकारी शिष्योत्तम प्राचार्य अनंतराव आठवले यांनी त्यांची परंपरा उत्तमोत्तमप्रकारे पुढे चालविली. श्रीदासगणु  महाराजांच्या अक्षरश: हजोरो शिष्यांचे उत्तम संघटन केले. तंत्रदृष्ट्याही त्या परंपरेला सुयोग्य असे वळण लावून दिले. याच शिष्यवरांच्या आग्रहाने श्रीमहाराजांची  वस्त्रसमाधी, ज्या ठिकाणी श्रीदासगणु  महाराज विश्रांतीसाठी  निवांतपणे रहात त्या गोरटे ग्रामी (मराठवाडा- नांदेडपासून  ४० कि. मी. वर) प्राचार्यांनी संस्थापिली. प्राचार्य आठवले स्वतः प्रसिद्धी -पराड्मुख असूनही केवळ कीर्तन- प्रवचने- व्याख्याने यांच्या  माध्यमातून त्या समाधीमंदिराला त्यांनी आता एक उत्तम अध्यात्मिक केंद्र बनविले. तेच  “श्रीमद सदगुरू  श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान” म्हणून आज प्रसिद्ध असून ते १९४७ मध्ये रीतसर पंजीबद्ध झालेले आहे. पंढपुरलाही श्री महाराजांच्या गृही त्यांनी श्री महाराजांच्या पादुका स्थापन केल्या. तेथेही या परंपरेचे अध्यात्मिक कार्य चालते.प्राच्यार्यानी निःस्वार्थपणे जीवनभर कीर्तने-प्रवचने केली, व्याखाने दिली आणि लोकस्थितीचा यथार्थ विचार करून समाजजागृतीचे कार्य केले. आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात  मनुष्य आपली शांती- समाधान हरवून बसला आहे. सत्ताभिलाषी नेते समाजाचे कल्याण करतील असा भरवसा राहिलेला नाही. अशा वेळी समाजात नैतिकतेची जोपासना करण्याचे कार्य संतांनी केले.  तीच परंपरा पू. अनंतरावांनी चालविली आणि त्यासाठी लोकजागृतीचे व्रत अंगीकारून कीर्तन – प्रवचनाचे  माध्यम  स्वीकारले. लोकजागृतीचे जणू व्रतच त्यांनी घेतले. आपल्याच संस्कृतीचे  वेदादि  प्राचीन श्रेष्ठ ग्रंथांचे ज्ञान आपल्याच समाजाला नीटसे नाही, उलट प्राचीन सच्चारित्रांचे कुतर्काच्या आधारे विडंबन जाणते साहित्यिकच करू  लागलेले पाहून  त्यांना  अतीव   दु:ख  झाले.  संस्कृतीवर अशोभनीय आरोप करणे,  समाजाच्या  श्रद्धास्थानांची टिंगल करणे, प्राचीन  ग्रंथाची  अवहेलना  करणे, यामध्येच विद्वानांना भूषण वाटू लागले. याचा  प्राचार्यांना  मनस्वी  त्रास   झाला.  परिणामतः त्यांच्या प्रतिकार करण्यासाठी प्राचार्यांनी  व्याख्याने दिली. “महाभारताचे वास्तव दर्शन” हा ग्रंथ त्याचीच फलश्रुती होय. कीर्तन-प्रवचनांचा माध्यम या दृष्टीने लक्षणीय ठरला.विचारप्रधान अशा सर्व व्याख्यानांना- त्यांनी केलेल्या खंडन-मंडनाला, त्यांच्या अध्यात्मिक जागृतीरूप  कीर्तन प्रवचनांना स्थायी स्वरूप लाभण्याच्या  दृष्टीने त्यांचे वाड्मय प्रसिद्ध करण्याची  कल्पना  पुढे  आली. यासाठी दासगणू- परिवारातील जेष्ठ सुहुद-शिष्यपरिवाराचा फार आग्रह झाला आणि  त्या  कल्पनेला १९८२ मध्ये मूर्तरूप प्राप्त झाले. तीसंस्था म्हणजे ” श्री राधादामोदार  प्रतिष्टान “.  गेली ३० वर्षे ही संस्था अध्यात्माच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्था चिरस्थायी कार्य करणारी असते म्हणून तिची उद्दिष्टेही विशाल असावी लागतात.